News Flash

पाकिस्तानला योग्य वेळ आल्यावर उत्तर देणार: भारतीय सैन्य

पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील

छायाचित्र प्रातिनिधीक

भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तानला योग्य वेळ आल्यावर उत्तर देणार असा इशारा भारतीय सैन्याने दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून दोन भारतीय जवानांना ठार करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा प्रकार सोमवारी समोर आला होता. या घटनेवर व्हाईस चिफ ऑफ आर्मी स्टाफ सरत चंद यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पाकिस्तान सैन्याला परिणाम भोगावे लागतील. त्यांना योग्य दिवशी आणि योग्य वेळी उत्तर दिले जाईल. पाकमध्ये कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा हे देखील आम्हीच ठरवू  असे सरतचंद यांनी म्हटले आहे. भारतीय जवानांवरील हल्ल्यावरुन पाकिस्तानची हताश मानसिकता दिसून येते असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी सकाळी लष्करी कामकाज विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओंशी चर्चा केली होती. भारतीय जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रकार म्हणजे घातक, भ्याड व अमानवी कृत्य आहे, त्याचा एकमुखी निषेध करून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, असे भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला बजावले होते. कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने दोन भारतीय सैनिकांचा केलेला शिरच्छेद ही तीव्र चिंतेची बाब आहे. ते अमानवी कृत्य असून नागरी संकेतांना त्यात पायदळी तुडवले गेले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या त्या भागातील छावणीने यात हे कृत्य करणाऱ्यांना पूर्ण पाठिंबा दिला. सीमा कृती पथक म्हणजे ‘बॅट’च्या पाकिस्तानी प्रशिक्षण छावण्या पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरलगत आहेत. त्याची भारताला चिंता वाटते. पाकिस्तानने जे घृणास्पद व क्रूर कृत्य केले आहे त्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा आधीच भारतीय लष्कराने दिला होता. पाकिस्तानने मात्र या कृत्यात सहभागी असल्याचा इन्कार केला आहे.

संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. दोन जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारतीय लष्कर पाकिस्तानी लष्कराच्या या अमानवी कृत्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले होते. पाकच्या हल्ल्यात २२ शीख इन्फन्ट्रीचे नायब सुभेदार परमजित सिंग व सीमा सुरक्षा दलाच्या दोनशेव्या बटालियनचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हे शहीद झाले होते. त्यांचा शिरच्छेद करून त्यांची डोकी पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या देशात नेल्याचे समोर आले होते.

भारत-पाकिस्तान यांच्यातील रावळकोट व पूँछ या भागांत असलेल्या स्थानिक कमांडरची सोमवारी रात्री बोलणी झाल्यानंतर लष्करी कारवाई महासंचालकांची मंगळवारी सकाळी ११.३० वाजता हॉटलाइनवर चर्चा झाली. पाकिस्तानने सांगितले की, पाकिस्तानी विशेष दले प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून गेली व त्यांनी भारतीय सैनिकांना ठार करून त्यांचा शिरच्छेद केल्याच्या आरोपाचे कुठलेही कृती करण्यायोग्य पुरावे भारताने दिलेले नाहीत. शस्त्रसंधीचे उल्लंघन व शिरच्छेदाचे आरोप पाकिस्तानने फेटाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 11:36 pm

Web Title: will respond to pakistan at time and place of our choosing says vice chief of army staff sarath chand
Next Stories
1 कर्नाटकमध्ये चित्रपट बघा फक्त २०० रुपयात, तिकीट दरावर सरकारची कात्री
2 दिल्लीत लवकरच मध्यावधी निवडणुका; भाजप आमदाराचे संकेत
3 …तर भारताला सडेतोड उत्तर देऊ; पाकच्या उलट्या बोंबा!
Just Now!
X