सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या पीएमएलए कोर्टात पंजाब नॅशनल बँक (पीएनबी घोटाळ्यातील फरार प्रमुख आरोपींपैकी एक मेहुल चोक्सीविरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आरोग्याचे कारण देत चोक्सीने चौकशीसाठी भारतात येण्यास वारंवार टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्याला अँटिगुवा येथून भारतात आणण्यासाठी आम्ही एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार आहोत, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील.


ईडीने प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले की, मेहुल चोक्सीने तपासामध्ये कधीही सहकार्य केलेले नाही. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, तरीही त्याने परत येण्यास मनाई केली आहे. त्यामुळेच त्याला फरार घोषीत करण्यात आले आहे.


चोक्सीला चौकशीत सहभागी होण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली. मात्र, तो चौकशी कायमच टाळत आला आहे. चोक्सीने दावा केला आहे की, त्याची ६१२९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मात्र, ही माहिती चुकीची असून चौकशीदरम्यान ईडीने केवळ २१०० कोटी रुपयांची संपत्तीच जप्त केली असल्याचे ईडीने प्रतिज्ञापत्रातून सांगितले आहे.


यापूर्वी १७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात चोक्सीने म्हटले होते की, त्याने पीएनबी घोटाळ्यात चौकशीपासून वाचण्यासाठी नव्हे तर इलाजासाठी देश सोडला होता. कॅरेबिअन देश अँटिगुवामध्ये पळून गेलेल्या चोक्सीने भारतातील आपले वकील विजय अग्रवाल यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्याने देश सोडल्याचे कारण सांगितले होते.