जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ओडिशामधील जगतसिंहपूर जिल्ह्यातील प्रसन्ना साहूदेखील शहीद झाले. ही बातमी मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मात्र अशा परिस्थितीही प्रसन्ना साहू यांच्या पत्नी मीना यांनी केलेलं वक्तव्य ऐकून अनेकांची छाती अभिमानाने फुलली. कुटुंबावर इतकं मोठं संकट कोसळलं असतानाही मीन यांनी आपल्या मुलाकडे इशारा करत म्हटलं की, ‘माझ्या पतीचं जे अपूर्ण कर्तव्य राहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा मुलगा जगन सीआरपीएफमध्ये भरती होईल’.

शहीद प्रसन्ना सीआरपीएफच्या 61 व्या बटालियनमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 1995 रोजी प्रसन्ना सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. प्रसन्ना यांच्या कुटुंबाला गुरुवारी रात्री सीआरपीएफ मुख्यालयातून शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांच्या घरात एकच शांतता पसरली असून सर्वांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत आहेत. प्रसन्ना यांच्या मागे त्यांची पत्नी मीना आणि दोन मुलं आहेत.

प्रसन्ना यांचा मुलगा जगन याने अजून एक सर्जिकल स्ट्राइक केला जावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. जगन सध्या बारावीत शिकत आहे तर बहिण रोनी पदवी शिक्षण घेत आहे. आम्हाला वडिलांचा अभिमान आहे, पण धक्क्यातून सावरता येणं कठीण असल्याची प्रतिक्रिया मुलगी रोनीने दिली आहे. प्रसन्ना यांनी गतवर्षी घर तयार करण्यास सुरुवात केली होती, जे यावर्षी पुर्ण होणार होतं अशी माहिती त्यांच्या भावाने दिली आहे.