“पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार राय बरेली लोकसभा मतदारसंघातूनही विजयी होईल” असा विश्वास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला. अमेठीच्या दौऱ्यावर असताना स्मृती इराणी यांनी हे वक्तव्य केले. मागच्यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या जायंट किलर ठरल्या होत्या. अमेठी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. पण २०१९ लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून इथून विजय मिळवला. शुक्रवारपासून स्मृती इराणी तीन दिवसाच्या अमेठी दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी जवळच असलेल्या राय बरेली लोकसभा मतदारसंघाला धावती भेट दिली.

आणखी वाचा- आज काँग्रेसचा स्थापना दिवस, पण राहुल गांधी कालच गेले इटलीला

राय बरेली हा काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. स्मृती इराणी यांनी लखनऊला जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुद्धा भेट घेतली. “तुम्ही भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देत राहिलात, तर २०२४ मध्ये रायबरेली सुद्धा तुमच्याकडे राहणार नाही” असे स्मृती इराणी जाहीर सभेत म्हणाल्या. गांधी कुटुंबावर हल्लाबोल करताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादविवाद करण्याचे आव्हान दिले. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांची उत्तर प्रदेशातील किसान यात्रा म्हणजे एक स्टंट आहे, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.