सुप्रीम कोर्टाने जर अयोध्या प्रश्नी निकाल दिला नाही तर उत्तर प्रदेश सरकार चोवीस तासात हा प्रश्न निकाली काढेल. राम मंदिर प्रश्नात नेमके काय करायचे हे कोर्टाला ठरवता येत नसेल तर आम्ही चोवीस तासात हा प्रश्न सोडवू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. योगी आदित्य नाथ हे ‘इंडिया टीव्ही’वरील ‘आपकी अदालत’ या शोमध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याचवेळी उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा प्रश्न निकाली काढावा. त्यांना काय करावं हे सुचत नसेल तर आमच्या हाती हा प्रश्न द्यावा आम्ही चोवीस तासात राम मंदिराचा प्रश्न निकाली काढू.

पहा व्हिडिओ

राम मंदिराचा प्रश्न देशभरात सध्या चांगलाच चर्चेत आहे. राम मंदिर प्रश्नी 29 जानेवारीला सुप्रीम कोर्ट काय म्हणणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. राम मंदिर झालेच पाहिजे अशी मागणी देशभरातील आणि खासकरुन उत्तर प्रदेशातील साधू संतांकडूनही होते आहे. अशात शिवसेनेनेही राम मंदिर प्रश्नी आवाज उठवला आहे. राम मंदिर झालेच पाहिजे अशी घोषणा करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येचा दौरा केला. एवढंच काय तर शिवसेनेसह अनेक पक्षांनी आणि साधू संतांनी राम मंदिर प्रश्नी अध्यादेश काढावा अशीही मागाणी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार ते पाहू त्यानंतर अध्यादेश काढण्याचे ठरवू अशी भूमिका घेतली आहे.

एकीकडे पंतप्रधानांनी अशी भूमिका घेतलेली असतानाच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र कोर्टाला जमत नसेल तर आम्ही चोवीस तासात राम मंदिराचा प्रश्न सोडवू असे म्हटले आहे. आता योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्याचे पडसाद कसे उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.