2019 लोकसभा निवडणुकीनंतर पाकिस्तान भारताशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. पाकिस्तानचे एक वरिष्ठ मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. चौधरी यांनी सांगितलं आहे की, ‘सध्या दिल्लीसोबत चर्चा करुन कोणताही फायदा होणार नाही. कारण सरकारकडून सध्या कोणत्याही सकारात्मक उत्तराची अपेक्षा नाही’. दुबईत गल्फ न्यूजशी बोलताना चौधरी यांनी सांगितलं की, ‘भारतातील नेते सध्या निवडणुकीत व्यग्र असल्या कारणाने त्यांच्याशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही’.

‘जोपर्यंत स्थिरता येत नाही तोपर्यंत चर्चा करण्याचा काहीही फायदा नाही. आम्ही निवडणुकीनंतर नव्या सरकारसोबत नव्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करु. आम्ही आमच्या चर्चेच्या प्रयत्नांना सध्या थांबवलं आहे. कारण आम्हाला सध्याच्या नेतृत्त्वाकडून कोणत्याही मोठ्य निर्णयाची अपेक्षा नाही’, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. भारत ज्या पक्ष किंवा नेत्याची निवड करेल त्याचा पाकिस्तान स्विकार करेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांना कोणता नेता पाकिस्तानसाठी जास्त फायदेशीर ठरेल राहुल गांधी की नरेंद्र मोदी असं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्हाला याचा काहीही फरक पडत नाही. जो कोणी नेता निवडणुकीनंतर सत्तेत येईल त्याच्याशी आम्ही चर्चा सुरु करु.

उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा पूर्णपणे बंद आहे. भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चाही 2017 पासून बंद आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सोडत नाही तोपर्यंत चर्चा करणार नसल्याची भूमिका भारताने घेतली आहे.