पाकिस्तानी सैन्याच्या स्नायपर्स कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल. फक्त वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू. याआधी सुद्धा पाकिस्तानच्या स्नायपर्स हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. मागच्या शुक्रवारी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याच्या स्नायपर्स हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले.

पाकिस्तानी सैन्याच्या या नापाक हरकतीनंतर भारतीय लष्करानेही पाकिस्तानला अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. परिणामकारक स्नायपर हल्ले हे शिरच्छेदांच्या घटनांसमान असतात. मोर्टार, हलक्या तोफा, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राच्या वापरापेक्षा स्नायपर्स हल्ले जास्त परिमाणकारक ठरतात. त्यामुळे प्रतिस्पर्धी सैन्याच्या मनोबलाचे खच्चीकरण करता येऊ शकते असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

सीमेवर शत्रू सैन्याच्या कारवाया वाढलेल्या असताना भारतीय पायदळाला अजूनही १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या रशियन बनावटीच्या ७.६२ एमएम ड्रॅग्युनोव्ह सेमी ऑटोमॅटिक स्नायपर रायफल्स वापराव्या लागत आहेत. या रायफलची रेंज ८०० मीटर आहे. भारतीय लष्कर मागच्या काही वर्षांपासून ५,७१९ ८.६ एमएम रायफलची मागणी करत आहे. या रायफलची रेंज १२०० मीटर आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानी लष्कराने स्नायपर्ससाठी प्रशिक्षण आणि उपकरणांमध्ये सुधारणा केली आहे. त्यांच्याकडे अमेरिकन बनावटीच्या चांगल्या दर्जाच्या स्नायपर रायफल्स आहेत.