लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. या निवडणुकीत इशान्य मुंबईतून भाजपाच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली असून विजयानंतर त्यांनी शुक्रवारी आपली प्रतिक्रिया दिली. गेले अनेक वर्षे आपण मुंबईचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. यापुढेही आपण मुंबईकरांना दिलासा देण्याचाच प्रयत्न करणार असल्याचे कोटक म्हणाले.

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी भाजपासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा अखेरच्या क्षणी सोडवण्यात आला होता. यापूर्वी या जागेवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी विजय मिळवला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांमुळे शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. दरम्यान, शिवसेनेचा विरोध पाहता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनोज कोटक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांचा 226486 मतांनी पराभव करत विजय मिळवला.

दरम्यान, नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आमचे प्राथमिक काम असल्याचे कोटक म्हणाले. आपला विजय आणि भाजपाला मिळालेले बहुमत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फलीत आहे. त्यांच्या मेहनतीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे ते म्हणाले. तसेच किरीट सोमय्या यांच्याकडून मी राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे घेतले आहेत. त्यांची आपल्या कारकिर्दीत अनेक प्रश्न सोडवले होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे वाईट वाटणे हे स्वाभाविक होते. परंतु त्यांच्याकडे अन्य जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेतही गेली साडेचार वर्षे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम मी केले आहे. तसेच आता संसदेतही नागरिकांचे प्रश्न आणि समस्या मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कोटक यांनी नमूद केले. जनता कामाच्या आणि कर्तुत्वाच्या आधारे मतदान करते. आपला विजय म्हणजे मतदारांनी दिलेला मान आहे. मुंबईकरांना आता दिलासा कसा देता येईल याचे आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच ईशान्य मुंबईला सरकारच्या धोरणांचा आणि प्रकल्पांचा फायदा करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.