भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मी निवडणूक नाही लढवली तरी त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आम्ही अथक मेहनत करु, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असतानाच ट्विटरवर एका युजरने सुषमा स्वराज यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची विनंती केली. ‘तुम्ही निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवणार आहात ?, आपण सर्वांनी मिळून मोदींना विजय मिळवून दिला पाहिजे, असे गौरव नामक युजरने म्हटले होते. यावर सुषमा स्वराज यांनी ट्विटच्या माध्यमातूनच सोमवारी रात्री उत्तर दिले आहे. सुषमा स्वराज ट्विटमध्ये म्हणतात, मी निवडणूक नाही लढवली तरी फरक पडणार नाही. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आणि भाजपाच्या उमेदवारांचा विजय व्हावा, यासाठी आम्ही जिवापाड मेहनत घेऊ, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुषमा स्वराज यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 2019 मधील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. सुषमा स्वराज यांच्यावर 2016 मध्ये मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी दीर्घकाळ उपचार घेतले होते. सुषमा स्वराज या मध्य प्रदेशमधील विदीशा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या आहेत.

2014 च्या लोकसभेत सुषमा स्वराज यांनी याच मतदार संघातून 4,10,698 मते घेत विजय नोंदवला होता. स्वराज या वयाच्या 25 व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळातील सर्वात तरूण कॅबिनेट मंत्री होत्या. संसदेत आपल्या भाषणांनी छाप पाडणाऱ्या सुषमा स्वराज या 3 वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. त्या काहीकाळ दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील होत्या.