विंडोज एक्सपी वापरकर्त्यांनी हॅकर्सपासून सावध राहावे तसेच आपल्या संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करीत नवे सॉफ्टवेअर तातडीने अद्ययावत करून घ्यावे, असा इशारा भारतीय सायबर सुरक्षा विभागाने दिला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एक्सपी वापरण्यासाठी जी पूरक प्रणाली लागते ती पुढील वर्षी ८ एप्रिलपासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम विंडोज एक्सपी ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांवर होण्याचा धोका असल्याचे सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने सुरक्षाविषयक बाबी, सशुल्क तसेच नि:शुल्क मार्गदर्शन तसेच ऑनलाइन तांत्रिक सहकार्य देण्याचे थांबवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात असा इशारा देण्यात आला आहे. सॉफ्टवेअर विक्रेते आणि हार्डवेअर उत्पादकांनी देखील विंडोज एक्सपी प्रणालीला पूरक तंत्र देण्याचे थांबवले असल्याचे संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने स्पष्ट केले आहे. याच्या सर्व वापरकर्त्यांनी तातडीने आपल्या संगणकात सुधारणा करून घ्यावी, असे त्यांनी सुचविले आहे.