मल्या, नीरव, मेहुलच्या जप्त मालमत्तांतून ४० टक्केच वसुली

मद्यसम्राट विजय मल्या, हिरे व्यापारी मामा-भाचे नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांना दिलेल्या कर्ज वितरणात फसवणूक झालेल्या सरकारी पंजाब नॅशनल बँकेला ६० टक्के कर्जावर पाणी सोडून द्यावे लागणार आहे.

राष्ट्रीयीकृत पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेऊन फसवणूक करून भारताबाहेर परागंदा झालेल्या विजय मल्या तसेच नीरव मोदी व मेहुल चोक्सीविरोधातील तपास यंत्रणांची कारवाई तीव्र झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने या बड्या उद्योगपतींच्या मालमत्ता जप्तही केल्या आहेत. पैकी मोठी रक्कम सरकारदफ्तरी जमा करण्यात आली आहे. मल्या, मोदी व चोक्सीला पंजाब नॅशनल बँकेने एकूण २२,००० कोटी रुपयांचे कर्ज दिले. पैकी संबंधितांचा मालमत्ता जप्त करून ९,०४१.५० कोटी रुपये सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. जप्त मालमत्तांमध्ये ५,८०० कोटी रुपयांच्या समभाग मूल्याचा समावेश आहे. त्यांची विक्री करून काही रक्कम मिळवण्यात सरकारला यश आले आहे.

नीरव मोदीची याचिका फेटाळली

लंडन : पीएनबी (पंजाब नॅशनल बँक) कर्ज फसवणूक प्रकरणातील भारतीय हिरे व्यापारी नीरव मोदी याची प्रत्यार्पणसंदर्भातील याचिका ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कर्ज फसवणुकीनंतर लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या नीरव याच्याविरुद्ध लंडनच्या गृहमंत्री व भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांनी प्रत्यार्पणाची कारवाई केली होती. या कारवाईला स्थानिक न्यायालयात दोन महिन्यांनी आव्हान देणाऱ्या नीरवची याचिका बेदखल करण्यात आली. नीरवला याबाबत येत्या पाच दिवसांत अपील करण्यासही सांगण्यात आले आहे.

कर्ज बुडवून आर्थिक गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध सरकारचे कठोर कारवाईचे धोरण यापुढेही कायम राहणार असून सरकारी बँकांचा पैसा पुन्हा मिळवला जाईल. कर्ज फसवणूक करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून सरकारी बँकांनीही वितरित कर्जापैकी मोठ्या प्रमाणातील रक्कम यापूर्वीच वसूल केली आहे. – निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री