विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारताकडे सोपवले. अभिनंदन सध्या दिल्लीमध्ये असून कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत त्यांच्या सध्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. शनिवारी सकाळी अभिनंदन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली.

शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अभिनंदन दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यांना लगेचच एअर फोर्सच्या सेंट्रल मेडिकल केंद्रात नेण्यात आले. बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांचे विमान कोसळण्याआधी त्यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमान पाडले.

एअर फोर्सच्या कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत सध्या अभिनंदन यांच्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. रविवारपर्यंत या चाचण्या सुरु राहतील अशी माहिती आहे. अभिनंदन यांच्याा उजव्या डोळयाचा बाजूला सूज आहे. शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास पाकिस्तानने त्यांना भारताकडे सोपवले. पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतरही त्यांनी जे धैर्य, हिम्मत दाखवली ते खरोखरच कौतुकास्पद आहे. समस्त देशवासियांना त्यांच्या या साहसाचा अभिमान आहे.

अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजल्यापासून सर्व देशवासियांच्या जीवाला घोर लागला होता. शुक्रवारीही भारताकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने अनेकांची धाकधुक वाढली होती. अखेर रात्री नऊच्या सुमारास तो ऐतिहासिक क्षण आला व अभिनंदन यांनी भारतात प्रवेश केला. सर्व देशवासियांसाठी तो क्षण खूप भावूक होता.