पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला धडकी भरवणारे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानेही हवाई हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न केला. कारण भारताने पुन्हा दिलेल्या प्रत्युत्तरावेळी पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. मात्र या कारवाई दरम्यान भारताचे मिग 21 हे विमानही उद्ध्वस्त झाले. ज्यानंतर विंग कमांडर अभिनंदन बेपत्ता आहेत. पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओही जारी केले आहेत.

पाकिस्तानने हा दावा केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना हे बजावलं आहे की विंग कमांडर अभिनंदन भारतात सहीसलामत परतले पाहिजेत. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन यांना पाकिस्तानकडून कोणतीही इजा होणार नाही याचीही खबरादारी घ्या असंही भारताने बजावलं आहे. मात्र एखादा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडण्याची ही पहिली घटना नाही. या घटनेमुळे कारगील युद्धाच्या वेळी पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या ग्रुप कॅप्टन नचिकेता यांच्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत.

काय घडले होते तेव्हा?
27 मे 1999 मध्ये कारगील युद्धाच्या वेळी ग्रुप कॅप्टन के. नचिकेता मिग 27 विमानातून पाकिस्तानी सेनेच्या घुसखोऱांवर बॉम्ब वर्षाव करत होते. त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे डझनभरापेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाले. कॅ. नचिकेता कारवाई करत असतानाच त्यांच्या विमानाला आग लागली, ज्यानंतर नचिकेता विमानातून सहीसलामत बाहेर पडले. पाकिस्ताच्या हद्दीत असलेल्या स्कार्दू या ठिकाणी ते पोहचले. तिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले. ज्यानंतर नचिकेता यांचा छळ करण्यात आला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय वायुसेनेच्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती काढण्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला. मात्र नचिकेता यांनी एक शब्दही तोंडून बाहेर काढला नाही.

कोणतीही माहिती त्यांनी पाकिस्तानला पुरवली नाही. ज्यामुळे त्यांचा शारीरीक छळ करण्यात आला. कारगील युद्धादरम्यान के. नचिकेता हे एकमेव युद्धबंदी होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताने पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला. त्यांना जिनेव्हा कराराची आठवणही करून दिली. ज्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर गुडघे टेकत पाकिस्तानने के. नचिकेता यांची सुटका केली. त्यांना रेड क्रॉसच्या हवाले करण्यात आले. ज्यानंतर नचिकेता वाघा बॉर्डरच्या रस्त्यावरून भारतात परतले.

विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडल्याने ग्रुप कॅप्टन के नचिकेता यांच्यासंदर्भातल्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत.