भारतीय वंशाच्या कुश शर्मा या सातव्या इयत्तेतील मुलाने अमेरिकेत मिसुरीच्या जॅकसन परगण्यातील प्रतिष्ठेची स्पेलिंग बी स्पर्धा ९५ व्या महाफेरीनंतर जिंकली आहे. गेल्यावेळी परीक्षकांकडील शब्दच संपल्याने आज ही फेरी घेण्यात आली. एकूण ९५ फेऱ्या झाल्यानंतर कुश शर्मा याला विजयी घोषित करण्यात आले. तो फ्रंटियर स्कूल ऑफ इनोव्हेशनचा विद्यार्थी असून त्याने ‘डेफिनेशन’ शब्दाचे स्पेलिंग सांगून जॅकसन परगण्याची स्पेलिंग बी स्पर्धा मिसुरी येथे जिंकली आता त्याला ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ या वॉशिंग्टन येथे मे महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत स्थान मिळाले आहे. काल एकूण २९ फेऱ्या झाल्या. साधारणपणे अशा स्पेलिंग स्पर्धात २० फेऱ्यात स्पर्धा संपते. २२ फेब्रुवारी२ रोजी परीक्षकांकडील शब्द संपल्याने कुश शर्मा याला दोन हप्त्यात ही स्पर्धा जिंकता आली. शर्मा याने हायलँड पार्क एलिमेंटरी या शाळेची पाचवीची विद्यार्थिनी सोफिया हॉफमन (वय ११) हिचा पराभव केला. कन्सास शहर सार्वजनिक वाचनालयात ही स्पर्धा झाली. त्यात हॉफमन हिचे ‘स्टिफलिंग’ शब्दाचे स्पेलिंग चुकले. दोघा स्पर्धकांनी एकूण २६० शब्दांची स्पेलिंग सांगितली, त्यात बारूझी, मुमू, हेमेरोकॅलिस, जॅकॅमर, श्ॉडेनफ्राइड या शब्दांचा समावेश होता.
२९ व्या फेरीत कुश शर्मा याला ‘डेफिनेशन’ या शब्दाचे स्पेलिंग विचारण्यात आले. त्याने त्या शब्दाचे स्पेलिंग व शब्दांच्या मूळावरून वाक्यात उपयोग करून दाखवला. त्यावेळी कुश हसला पण परीक्षक केट स्टोव्हर हसले नाहीत. हॉफमन हिच्या आईवडिलांनी परीक्षकांकडे ‘स्टिफलिंग’ शब्दाच्या उच्चाराविषयी गोंधळ असल्याची तक्रार केली. त्यानंतर रेकॉर्डिग तपासून उच्चारात काही चूक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. शर्मा याने सांगितले की, हा अतिशय चांगला अनुभव होता. पुढील वर्षी आपण परत येऊ असे हॉफमन हिने धीर न सोडता सांगितले.