हंगेरीचे लेखक लास्लो क्रस्नाहोर्काइ यांना ब्रिटनचा प्रतिष्ठेचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार कादंबरीसाठी जाहीर झाला असून, त्यांनी भारताचे अमिताव घोष व इतर आठ जणांना मागे टाकले आहे.
निवड समितीच्या अध्यक्षा मरिना वॉर्नर यांनी लास्लो क्रस्नाहोर्काइ यांची तुलना फ्रँझ काफ्का व बेकेट यांच्याशी केली असून काफ्का हे लास्लो क्रस्नाहोर्काइ यांचे साहित्यातील आदर्श आहेत. लास्लो क्रस्नाहोर्काइ हे काफ्का व बेकेट यांच्या तोडीचे लेखक आहेत असे वॉर्नर यांचे म्हणणे आहे.
चमत्कारिक गोष्टीतून रोमांचकता निर्माण करणे, नंतर काल्पनिकतेशी पुन्हा सूर जुळवणे हे काफ्काच्या गोष्टीतील तंत्र त्यांनी वापरले आहे असे वॉर्नर यांनी म्हटले आहे. या वेळी लास्लो क्रस्नाहोर्काइ यांना अमिताव घोष, लिबियाचे इब्राहिम अल कोनी, मोझांबिकचे मिया कोटो, अमेरिकेच्या फॅनी होवे यांचे आव्हान होते. कोलकात्यात जन्मलेल्या अमिताव घोष यांना २००८ मध्येही या पुरस्काराने हुलकावणी दिली होती. लास्लो क्रस्नाहोर्काइ हे द्रष्टे लेखक असून, वर्तमानातील अस्तित्वाचे वर्णन ते भयानक, विचित्र, काही वेळा विनोदी अशा सर्व पद्धतीने करतात. त्यांच्या पुस्तकाचे भाषांतर जॉर्ज झिरटस व ऑटेली मुलझेट यांनी केले असून, त्यांना १५ हजार पौंड दिले जात आहेत. क्राझनाहोरकाय यांची पहिली कादंबरी ‘सॅटनटँगो’ नावाने १९८५ मध्ये हंगेरीत प्रसिद्ध झाली, नंतर त्यावर बेला तार यांनी चित्रपटही काढला. १९८९ मध्ये त्यांनी ‘द मेलानकोली ऑफ रेझिस्टन्स’ ही कादंबरी लिहिली ती १९९८ मध्ये इंग्रजीत प्रसिद्ध झाली.
लास्लो क्रस्नाहोर्काइ (वय ६१) यांनी व्हिक्टोरिया व अल्बर्ट म्युझियम येथे पुरस्कार स्वीकारताना सांगितले की, काफ्का, गायक जिमी हेंड्रिक्स व जपानमधील क्योटो शहर या आपल्या प्रेरणा आहेत. मॅन बुकर पुरस्कार ६० हजार पौंडाचा असून, इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. कुठल्याही लेखकाला हा पुरस्कार आयुष्यात एकदाच दिला जातो.
‘ मॅन बुकर इंटरनॅशनल’
‘ मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिक दर दोन वर्षांनी दिले जाते. हयात असलेल्या कोणत्याही देशातील लेखकाच्या इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या अथवा भाषांतरित झालेल्या साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार २००५ पासून सुरू झाला असून, त्यात लेखकाच्या एकाच कलाकृतीऐवजी सर्वागीण साहित्याचा विचार केला जातो. २०१३ साली लिडिया डेव्हिस यांना त्यांच्या अतिलघुकथा निर्मितीसाठी मॅन बुकर मिळाला होता.