दुसऱ्या महायुद्धात युकेला विजय मिळवून देणारे ब्रिटनचे मुत्सदी राजकारणी आणि पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट नुकतीच समोर आली आहे. चर्चिल यांचे चाहते आणि त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्यांना हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की त्यांच्या या पहिल्या प्रेमाचं कनेक्शन हे भारताशी आहे. चर्चिल यांनी स्वतः लिहिलेलं एक पत्र नुकतंच उजेडात आलं या पत्रातूनच हा खुलासा झाला आहे.

इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्या महायुद्धात महत्वाची भूमिका बजावण्यापूर्वी चर्चिल हे सन १८९६ भारतात आले होते, तेव्हा केवळ २२ वर्षांचे होते. त्यावेळी ते ब्रिटिश सैन्यात ज्युनिअर ऑफिसर होते. त्यावेळी त्यांची भेट पामेला बुलवर-लिट्टन यांच्याशी झाली. पामेला यांचे पती लिट्टन यांचे त्यावेळी निधन झाले होते.

२६ ऑक्टोबर १८९६ रोजी चर्चिल यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, आजवर मी पाहिलेल्या मुलींमध्ये पामेला ही सर्वाधिक सुंदर मुलगी आहे. दरम्यान, या दोघांमध्ये प्रेमही फुललं आणि ते अनेक वर्ष सोबतही राहिले. या काळात चर्चिल यांनी पामेला यांना लग्नाची मागणीही देखील घातली होती.

हैदराबादमधील पोलो स्पर्धेत चर्चिल यांची पामेलाशी ओळख झाली होती. त्यावेळी ते ब्रिटिश सैन्यात घोडदळात होते. इतिहासाच्या पुस्तकांनुसार, हैदराबादमध्ये त्याकाळी या जोडीने अनेकदा एकत्र जेवण केलं आणि अनेकदा हत्तीची सवारी देखील केली होती.

ज्यावेळी चर्चिल भारत सोडून निघून गेले त्यानंतर ही जोडी एकमेकांना पत्र लिहित असे. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेत असताना चर्चिल यांनी पामेला यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि लग्नाची मागणी घातली. मात्र, पामेला यांनी त्यांचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे चर्चिल यांना पामेला यांचं मन काही जिंकता आलं नाही.

दरम्यान, १३ जुलै १९५७ रोजी लिहिलेल्या एका पत्रातून चर्चिल आणि पामेला हे अनेक काळासाठी किती चांगले मित्र होते याचा उल्लेख आढळतो. स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या या खासगी पत्रावर विन्स्टन चर्चिल यांच्या अद्याक्षरांची सही आहे. ती अद्याक्षरे WSC अशी लिहिलेली आहेत. चर्चिल यांच्या चार्टवेल येथील केन्ट कन्ट्री हाऊस येथून हे पत्र पाठवलेलं होतं. या पत्राची सुरुवात ‘Dear Pamela’ अशा शब्दांनी करण्यात आली आहे. तसेच या पत्राचा शेवट ‘You were wonderful as a companion. With all my love’ असा केलेला आहे.

लंडनमधील काही वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, फ्रॅन्सिस्को पिनेरो यांच्या जुन्या वस्तूंच्या कलेक्शनमध्ये चर्चिल यांचं हे पत्र होतं ते त्यानी विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे पत्र नुकतचं चर्चेत आलं. या पत्राला लिलावात दीड हजार पौंड पेक्षा अधिक रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.