उत्तर भारतात रक्त गोठवणाऱ्या थंडीने नववर्षांच्या पहिल्याच दिवसाचे स्वागत केले आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब व हरयाणा राज्यातील बहुतेक भागांतील तापमान मंगळवारी सामान्य पातळीपेक्षा कमी होते. थंडीमुळे पसरलेल्या धुक्याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाल्याने सामान्य नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली.
 राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी या हंगामातील सर्वात कमी चार अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. जे सामान्य तापमानापेक्षा तीन अंशने कमी आहे. दिल्लीमध्ये सोमवारी ५.५ सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले होते. बुधवारीही दिल्लीमध्ये थंडी कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दिल्लीप्रमाणेच राजस्थानमध्येही थंडीचा जोर कायम आहे. राजस्थानातील चुरूमध्ये सर्वात कमी ०.७ अंश से. इतक्या तापमानाची नोंद झाली. पिलानीमध्ये १.४, श्रीगंगानगरमध्ये ४.३, बिकानेरमध्ये ४.५ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले.
पंजाब व हरयाणा राज्यातही थंडीचा जोर कायम आहे. दोन्ही राज्यांत सामान्य पातळीपेक्षा ४ अंश सेल्सियसने पारा खाली घसरला होता.