पाकच्या मुद्दय़ावरून मोदींनी मनमोहनसिंगांची माफी मागण्यासाठी काँग्रेस आक्रमक

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्र्याच्या मेजवानीत सहभागी झाल्यावरून माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या बेफाम आरोपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याच्या मुद्दय़ावरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने राज्यसभेत आक्रमक सूर लावला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव आणि अली अन्वर अन्सारी यांची खासदारकी निलंबित केल्याप्रकरणी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडूंना वीस मिनिटांसाठी सभागृह तहकूब करावे लागले. त्यानंतर सभागृह सुरू होताच काँग्रेसने मनमोहनसिंग यांच्याविरुद्धच्या मोदींच्या टिप्पणींचा मुद्दा उचलला.

विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नियम २६७खाली मनमोहनसिंग यांच्यावरील आरोपांच्या गंभीर मुद्दय़ाची चर्चा करण्यासाठी नियोजित कामकाज बंद करण्याची नोटीस दिली; पण अध्यक्ष नायडूंनी ती फेटाळल्याने विरोधक भडकले. ‘माजी पंतप्रधानांसह माजी लष्करप्रमुख, परराष्ट्र मंत्रालयाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पाकबरोबर हातमिळविणी केल्याचा गंभीर आरोप दस्तुरखुद्द पंतप्रधानांनीच केले आहेत,’ असे आझाद म्हणाले. शेवटी गोंधळात पुन्हा कामकाज थांबवावे लागले.

काँग्रेसमधून निलंबित झालेले मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्यासाठीच्या मेजवानीवरून मोदींनी सिंग यांच्यासहीत काँग्रेसला लक्ष्य केले होते. ‘आदल्या दिवशी अय्यर यांच्या घरी बैठक झाली आणि दुसरया दिवशी त्यांनी मला नीच म्हणून हिणवले. हा गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. गुजरातमध्ये निवडणूक असताना अशी गोपनीय बैठक घेण्याचे कारण काय?, असा सवाल मोदींनी केला होता. गुजरात निवडणुकीमध्ये पाकचा हस्तक्षेप होत असल्याचेही मोदींनी सूचित केले होते. त्यास डॉ. सिंग यांनी धारदार उत्तर दिले होते. गुजरातमधील संभाव्य पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले असून राजकीय फायद्यसाठी ते माजी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख पदाच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवित असल्याचे ते म्हणाले होते. राजकीय कुरघोडय़ा करण्यामध्ये उर्जा वाया घालविण्याऐवजी आपल्या पदाला शोभेल अशा परिपक्वतेने पंतप्रधान मोदींनी वागावे आणि पदाचा मर्यादाभंग केल्याबद्दल देशवासीयांच्या माफीचीही मागणी त्यांनी मोदींकडे केली होती.

‘याचना कशाला करता?

राज्यसभेचे कामकाज चालविण्याच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडूंनी शुRवारी एक महत्वाचा बदल केला. कोणतीही कागदपत्रे, अहवाल, विधेयक सभागृहाच्या पटलासमोर सादर करताना मंत्री व सदस्यांकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी मी सभागृहाकडे ‘याचना करतो’ असे स्वरूपाचे (‘आय बेग टू ले आन दि टेबल दि पेपर्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम’) वाक्य बोलण्याची प्रथा आहे. त्यातील ‘आय बेग’ या शब्दावर आक्षेप घेत नायडू म्हणाले, ‘याचना करण्याची काय गरज आहे? आपण आता स्वतंत्र देश आहोत. मी सभागृहात कागदपत्रे सादर करीत आहोत, एवढे म्हटले तरी पुरेसे आहे.’ अर्थात हा नियम नसून सूचना असल्याचेही त्यांनी लगेचच स्पष्ट केले. श्रद्धांजली वाहताना आजतागायत अध्यक्ष उभे राहत नसत. मात्र नायडूंनी तो पायंडाही मोडीत काढला.