News Flash

गुजरात निकालावर संसदेचा नूर

मुस्लिम महिला विवाह विधेयक मांडणार

( संग्रहीत छायाचित्र )

आजपासून हिवाळी अधिवेशन, ठेवी संरक्षण व मुस्लिम महिला विवाह विधेयक मांडणार

गुजरात मतदान होईपर्यंत टाळलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून (शुक्रवार) चालू होत असून ते वादळी होणार की सरकारच्या अजेंडय़ाबरहुकूम चालणार हे ठरवतील येत्या सोमवारी लागणारे गुजरात विधानसभेचे निकाल. गुजरातच्या साथीने भाजपने हिमाचल प्रदेशही जिंकला तर फुरफुरणाऱ्या विरोधकांच्या फुग्याला टाचणी लागेल आणि जर चमत्कार होऊन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा गुजरात भाजपकडून हिसकावून घेण्याचा चमत्कार केलाच तर मग मोदी सरकारची संसदेमध्ये अग्नीपरीक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.

खरे तर हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात चालू होते. पण विरोधकांना सरकारवर हल्ले चढविण्याचे आयतेच कोलित मिळू नये, यासाठी मोदी सरकारने अधिवेशनच १५ डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुरुवारी गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्याबरोबर लगेचच शुक्रवारी (दि. १५) अधिवेशन चालू होत आहे. हे पाच जानेवारीपर्यंत चालेल. या कालावधीत १४ दिवसांचे कामकाज अपेक्षित आहे.

दोन-तीन अधिवेशनांचा अपवादवगळता आतापर्यंतच्या सर्व अधिवेशनांमध्ये शंभर टक्क्यांच्या आसपास कामकाज करण्यात सरकारला यश मिळाले आहे. अगदी राज्यसभेत सरकार अल्पमतात असतानाही. पण एकीकडे राज्यसभेतील संख्याबळ सरकारच्या बाजूने झुकले आहे, पण आतापर्यंत अचेतन पडलेल्या काँग्रेसमध्ये पुन्हा नव्याने प्राण फुंकले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुजरातमधील भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांनी विरोधकांच्या अंगावर मूठभर मांस चढले आहे. त्यातच राहुल गांधी आज (शनिवार) काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे घेत आहेत. जर काँग्रेसला अगदी सत्ता मिळाली नाही, पण गुजरातमध्ये चांगली कामगिरी करून दाखविता आली तरी काँग्रेसजनांसाठी ती चांगली बातमी असेल. एका अर्थाने राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्याची प्रक्रिया वेगवान होईल. पण एवढे करूनही गुजरातमध्ये भाजपला उत्तर प्रदेशच्या धर्तीवर यश मिळाल्यास राहुल यांच्या नेतृत्वाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उमटण्यास सुरुवात होईल.

दरम्यान, गुजरातबाबतची उत्कंठा गृहीत धरूनही सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी आपापल्या तलवारी परजल्या आहेत. या अधिवेशनामध्ये २५ विधेयके मंजूर करण्याचा आणि १४ विधेयके सादर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दुसरीकडे विरोधकांकडे वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि गोरक्षकांच्या कारवाया असे प्रमुख मुद्दे असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:15 am

Web Title: winter session of parliament after gujarat legislative assembly election 2017
Next Stories
1 बेपत्ता सरकारी अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला
2 गुजरात निवडणूक : आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल
3 Gujarat Election 2017 EXIT POLL : भाजप पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता
Just Now!
X