संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्यास भाजप विलंब करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच शुक्रवारी केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या. १५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत अधिवेशन होणार असून, अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी केले.

गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे मोदी सरकार हिवाळी अधिवेशनाला विलंब करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केला होता. मंत्र्यांचे घोटाळे, राफेल खरेदी व्यवहार, जीएसटी आणि नोटाबंदी यामुद्द्यांवरुन कोंडी होण्याची शक्यता असल्याने सरकार विलंब करत आहे, असा आरोपही विरोधी पक्षांनी केला होता.

अखेर हिवाळी अधिवेशनाला मुहूर्त सापडला असून, शुक्रवारी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या. १५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत अधिवेशन होईल, २४ व २५ डिसेंबररोजी ख्रिसमस निमित्त सुटी असेल. हे अधिवेशन एकूण १४ दिवस चालेल, असे त्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिवेशनाला सर्व खासदारांची १०० टक्के उपस्थिती असेल, अशी आशाही त्यांनी वर्तवली.

गुजरात निवडणुकीसाठी संसदेचे अधिवेशन लांबणीवर टाकल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला होता. लोकशाहीच्या मंदिराला कुलूप लावून घटनात्मक उत्तरदायित्व टाळण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी ठणकावले होते.