वीस प्रश्नांची उकल केल्यास मोदींशी थेट संपर्क
मोदी सरकारच्या कामगिरीबाबत वीस प्रश्नांची उत्तरे तुम्ही पाच मिनिटांत दिलीत, तर तुम्हाला पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची संधी मिळणार असून त्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. ‘माय गव्ह’ या सरकारी संकेतस्थळाने यात पुढाकार घेतला असून प्रशासनात सुधारणा करण्याचा हेतू त्यामागे आहे.
संकेतस्थळावर म्हटल्यानुसार जे लोक विजयी होतील व ज्यांची जास्तीत जास्त उत्तरे बरोबर येतील, त्यांची निवड पंतप्रधानांना भेटण्यासाठी केली जाईल. पण जर अनेकांनी उत्तरे बरोबर दिली असतील तर कमी वेळात कुणी उत्तरे बरोबर दिली, त्या व्यक्तीला विजयी घोषित केले जाईल. अवघड प्रश्न बाजूला ठेवण्याची किंवा ते नंतर घेण्याची सुविधा यात दिली आहे.

काय करायला हवे?
प्रश्नपत्रिकेतील कुठलेही वीस शब्द यांत्रिक पद्धतीने निवडून त्यांची उत्तरे सहभागी व्यक्तींनी द्यायची आहेत. यात २०१५-१६ मध्ये सौर ऊर्जा क्षमतेत किती भर पडली, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
थेट हस्तांतर योजनेतून किती पैसा सामान्य लोकांच्या खात्यात गेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेअंतर्गत किती जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.
सहभागी व्यक्तींनी यात चारपैकी एका पर्यायावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले हे लगेच पडद्यावर दिसणार आहे.