सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत अनेकांना मदत केली आहे. त्यांनी आपल्या कार्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. ट्विटरवरून तर अनेक जण त्यांच्या कामगिरीचं कौतुक करतात. त्यांच्या प्रशंसकांची यादी खूप मोठी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यात आता पाकिस्तानच्या एका महिलेची भर पडली आहे. या महिलेनं सुषमा स्वराज यांचं ट्विटरवरून तोंडभरून कौतुक केलं आहे. सुषमाजी, तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होतात. असं झालं असतं तर आमचा देश बदलला असता, असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या एका व्यक्तीला उपचारांसाठी भारतात यायचं होतं. पण मेडिकल व्हिसा न मिळाल्यानं त्याला भारतात येणं शक्य होत नव्हतं. याच व्यक्तीच्या मदतीसाठी हिजाब नावाच्या पाकिस्तानी महिलेनं सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. सुषमा स्वराज यांनीही त्याची दखल घेतली. या प्रकरणात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश त्यांनी भारतीय दूतावासाला दिले होते. त्यानंतर भारतीय दूतावासानंही हिजाबला मदत करण्याचं आश्वासन देऊन त्यावर कार्यवाही सुरू असल्याचं ट्विटरवरून सांगितलं. स्वराज यांनी मदत केल्यानं हिजाब त्यांची ‘फॅन’ झाली. तिनं ट्विट करत स्वराज यांचे आभार मानले. तुमच्याबद्दल काय बोलावं? सुपरवुमन म्हणू की ईश्वर? तुमचे आभार कोणत्या शब्दांत मानावेत. त्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. तुम्हाला खूप-खूप प्रेम. माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आहेत. तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होतात. आमचा देश बदलला असता, असं ट्विट तिनं स्वराज यांचं कौतुक केलं.

दरम्यान, याच आठवड्याच्या सुरुवातीला भारतातील एका नागरिकानं आपल्या पाकिस्तानी पत्नीसाठी व्हिसा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी विनंती स्वराज यांच्याकडे केली होती. त्यावर स्वराज यांनी दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचीच मने जिंकली होती.