आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांनी शुभेच्छा दिल्या. नवे सरकार जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करील, असे या पक्षांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांकडून सहकार्याचे आश्वासन
दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दूरध्वनी करून अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकार दिल्ली सरकारला सर्व सहकार्य करील, असे पंतप्रधानांनी या वेळी केजरीवाल यांना सांगितले. काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनीही केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. नव्या सरकारने आश्वासनांची पूर्तता केल्यास काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील, असे अहमद म्हणाले.
भाजपकडून शुभेच्छा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनीही दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आप आणि काँग्रेस हे दिल्लीत स्थिर सरकार देतील आणि निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल, अशी अपेक्षा राजनाथसिंग यांनी व्यक्त
केली.
भाकपचाही पाठिंबा
भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन भाकपने केजरीवाल यांच्या सरकारला दिले आहे. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर भाकप आणि आपची भूमिका यामध्ये साम्य आहे, असे भाकपचे दिल्ली विभागाचे चिटणीस धीरेंद्र शर्मा यांनी म्हटले आहे.
रमणसिंग यांच्याकडून शुभेच्छा
छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशसेवा हाच राजकारणाचा उद्देश -अण्णा हजारे
राजकारणाचा उद्देश हा देशाची सेवा करणे असा आहे, असा संदेश देऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण शपथविधी समारंभाला उपस्थित राहू शकलो नाही, असे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. राजकारण हा चिखल आहे, असे अण्णा हजारे नेहमीच सांगत, मात्र चिखल साफ करण्यासाठी चिखलातच उतरावे लागेल, असे सांगून अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला. परिणामांची पर्वा न करता समाज आणि देशाची सेवा करा, असेही अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना सांगितले आहे.