देशात करोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आता देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये ३६ हजार ६०४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ९९ हजार ४१४ झाली आहे. तर, याच कालावधीत ५०१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता १ लाख ३८ हजार १२२ झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४ लाख २८ हजार ६४४ वर आहे. याशिवाय मागील २४ तासांमध्ये ४३ हजार ६२ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची देशातील एकूण संख्या आता ८९ लाख ३२ हजार ६४७ झाली आहे.

याशिवाय करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपर्यंत देशभरात १४,२४,४५,९४९ नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यापैकी १० लाख ९६ हजार ६५१ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

संपूर्ण देशाला करोना प्रतिबंधक लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येकाचे लसीकरण केले जाईल, असे कधीही म्हटलेले नाही, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर करोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यश आले तर देशातील प्रत्येकाला लस देण्याची आवश्यकता नसेल, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव म्हणाले आहेत.

सरसकट सर्वाना लस नाही!

करोना प्रतिबंधक लस योग्य वेळी बाजारात उपलब्ध होईल, असेही भूषण यांनी यावेळी सांगितले. या अगोदर सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी, पुढील दोन-तीन महिन्यांत लस उपलब्ध होऊ शकेल व जुलै-ऑगस्टपर्यंत देशातील ३० कोटी लोकांचे लसीकरण केले जाईल, असे सांगितले होते.