देशातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याशिवाय करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ३८ हजार ७७२ नवे करोनाबाधित आढळले असून, ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ३१ हजार ६९२ वर पोहचली आहे.

सध्या देशात ४ लाख, ४६ हजार ९५२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, करोनामुळे आतापर्यंत १ लाख ३७ हजार १३९ रुग्ण दगावले आहेत. याशिवाय करोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४५ हजार ३३३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे आतापर्यंत देशातील करोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्याची एकूण संख्या ८८ लाख ४७ हजार ६०० वर पोहचली आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आतापर्यंत १४,३,७९,९७६ नमुन्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. यातील ८ लाख ७६ हजार १७३ नमुने काल(रविवार) तपासले गेले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव भविष्यात होऊ नये म्हणून लसनिर्मितीचे काम सुरू असून चार कंपन्यांचे निष्कर्ष आता हाती आले आहेत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात तातडीच्या वापराचे परवाने दिले जातील. त्यामुळे मार्च व एप्रिलपासून लसीकरणास सुरुवात होऊ शकते, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केलेले आहे.

तर, जानेवारीपासून दर महिन्याला करोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लशीच्या दहा कोटी मात्रा (डोस) तयार करण्यात येणार असून, लस सर्वात आधी भारतीयांनाच देण्यात येईल, अशी ग्वाही ‘सीरम इन्स्टिटय़ूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सीरम इन्स्टिटय़ूटला भेट देऊन लस निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला होता. त्यानंतर पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत लशीच्या निर्मितीबाबत माहिती दिली. ‘‘सीरम सध्या दर महिन्याला लशीच्या ५ ते ६ कोटी मात्रा तयार करत आहे, जानेवारीपासून ही प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि प्रतिमहिना दहा कोटी मात्रा तयार केल्या जातील.’’ असं पूनावाला म्हणाले आहेत.