देशात करोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाहीए. भारतात करोना विषाणूने ४० लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. तर आजवर ७० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारत जगात करोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिललाही मागे टाकलं आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत भारतापुढे आता केवळ अमेरिकाच आहे.

अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा हा ६२ लाखांच्या पार पोहोचला आहे. तर १ लाख ८७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २२ लाख ८३ हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. तर या देशात अद्याप ३७ लाखांहून अधिक करोनाबाधित लोक आहेत. ब्राझिलमध्ये बाधितांचा आकडा हा ४१ लाखांच्या जवळपास आहे. तर १ लाख २५ हजारांहून अधिक लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ३४ लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत. तर ५ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. शनिवारी रात्री राज्यांकडून आलेल्या आकडेवारीनंतर भारताने ब्राझिलला मागे टाकल्याचे समोर आले.

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाबाधितांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ वर पोहोचली आहे. आजवर ६९,५६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात शनिवारी आजवर सर्वाधिक ८६,४३२ प्रकरणं समोर आली आहेत.

महाराष्ट्राला देशात सर्वाधिक करोनाचा फटका बसला आहे. राज्यात ८ लाख ६३ हजारांहून अधिक बाधित रुग्ण आहेत. सुमारे २६ हजार लोक या आजाराचे बळी पडले आहेत. यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. तिथे ४ लाख ७६ हजारांहून अधिक करोनाबाधितांची प्रकरणं समोर आली आहेत. तर ४२०० हून अधिक लोकांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा क्रमांक लागतो.