जगभरासह देशभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. देशात मागील २४ तासांमध्ये ४५ हजार २३० नवे करोनाबाधित आढळले असून, ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८२ लाख २९ हजार ३१३ वर पोहचली आहे. करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला तरी देखील कराना रुग्ण संख्येत व मृतांच्या संख्येत भर पडतच आहे.

देशभरातील एकूण ८२ लाख २९ हजार ३१३ करोनाबाधितांमध्ये ५ लाख ६१ हजार ९०८ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७५ लाख ४४ हजार ७९८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २२ हजार ६०७ जणांच्या संख्येचा समावेश आहे. मागील २४ तासांमध्ये ५३ हजार २८५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तसेच, १ नोव्हेंबरपर्यंत देशभरात ११,०७,४३,१०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ८ लाख ५५ हजार ८०० नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

देशात ऑक्टोबरमध्ये करोनाचे १८,७१,४९८ रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये ही संख्या २६,२१,४१८ होती. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये करोनाबळींमध्येही घट नोंदविण्यात आली आहे.या महिन्यात २३,४३३ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबरमध्ये जवळपास रोज मृतांचा आकडा एक हजारपेक्षा अधिक होता. देशातील एकूण मृतांमध्ये हे प्रमाण १९.१९ टक्के आहे.

औषधे नियामक अधिकाऱ्यांनी आवश्यक परवानग्या दिल्यास भारत बायोटेक कंपनीची करोना प्रतिबंधक लस पुढील वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे.

सध्या कंपनीच्या लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात असून त्या देशातील विविध शहरांमध्ये घेण्यात आल्या. कंपनीच्या कोव्हॅक्सिनची निर्मिती भारतीय वैद्यक संशोधन परिषद व राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. त्यात निष्क्रिय असलेला सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू वापरण्यात आला आहे. हा विषाणू आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत वेगळा करण्यात आला होता.