देशात करोना संसर्गाचे प्रमाण अद्यापही वाढतच आहे. करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भर पडत असली, तरी देखील नवे करोनाबाधितही मोठ्या संख्येने आढळत असून, मृत्यू देखील सुरूच आहेत. आता देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने ९० लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४५ हजार ८८२ नवे करोनाबाधित आढळले, तर ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९० लाख ४ हजार ३६६ वर पोहचली आहे.

याचबरोबर मागील २४ तासांमध्ये ४४ हजार ४०७ जणांनी करोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयांमधून सुट्टी देण्यात आली आहे. आता देशात ४ लाख ४३ हजार ७९४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय करोनामुळे देशभरात आजपर्यंत १ लाख ३२ हजार १६२ रुग्ण दगावले आहेत.

१९ नोव्हेंबरपर्यंत देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर १२,९५,९१,७८६ नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यातील १० लाख ८३ हजार ३९७ नमुने काल तपासण्यात आल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

दरम्यान, सणासुदीच्या काळात लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याने करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा काहीस वाढल्याचे दिसत आहे. करोनावरील लस बाजारात येण्यासाठी आता केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचा दावा सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान कोविशिल्ड ही लस भारतात उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.