देशात करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. बुधवारी भारतात करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत ९३४ इतकी भर पडली. या वाढीसह देशातील एकूण करोनाबळींची संख्या ४७ हजार ६५ इतकी झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

भारताआधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सीकोचा क्रमांक लागतो. १३ दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावर पोहचला होता. दररोज होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे भारत आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीचरच्या आकडेवारीनुसार, भारतात ४७ हजारांपेक्षा जास्त जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ब्रिटनमध्ये ४६ हजार ७०६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी भारताने ब्रिटनला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारताचा मृत्यूदर फक्त दोन आहे. तर यूकेचा मृत्यूदर १४.९ टक्के आहे.
रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी चौथ्या स्थानी असलेल्या ब्रिटनलाही भारतानं मागे सोडलं आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत अमेरिका (१ लाख ६८ हजार २१९), ब्राझील (एक लाख ३ हजार ९९), मेक्सिको (५३ हजार ९२९) आणि चौथ्या स्थानी भारत आहे.

देशात मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक ५६ हजार ११० रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.३८ टक्क्यांवर पोहोचले आहे. १६ लाख ३९ हजार ५९९ रुग्ण करोनामुक्त झाले असून ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या महिनाभरात दैनंदिन करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी १५ हजारांवरून ५० हजारांवर गेली. १ ते ७ जुलै या सप्ताहात सरासरी १५ हजार १८ रुग्ण बरे झाले व त्यानंतर ५ ते ११ ऑगस्ट या सप्ताहापर्यंत सलग पाच आठवडय़ांत अनुक्रमे सरासरी १८ हजार ७८७, २१ हजार ८७४, ३२ हजार ५९५, ३९ हजार ६८१ व ५० हजार ४२६ रुग्ण दररोज करोनामुक्त झाले. करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा सुमारे १० लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक ७ लाख ३३ हजार ४४९ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण २.६ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. १० लाख लोकसंख्येमागे १८ हजार ८५२ नमुना चाचण्या घेतल्या जात आहेत. देशभरात आता १४२१ वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत.