बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे. तर, संयुक्त जनता दलाचे माजी नेते राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर उर्फ ‘पीके’ यांनी नितीश कुमार यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

”भाजपा नामनिर्देशित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनिंदन. राज्याला काही वर्षांपर्यंत एका थकलेल्या व राजकीयदृष्ट्या महत्वहीन झालेल्या नेत्याच्या प्रभावहीन सरकारसाठी तयार रहायला हवे.” असं प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- भाऊ सातव्यांदा CM झाल्यानंतरही नितीश यांची बहीण नाराज, म्हणाली, “आता भावाने पंतप्रधान व्हावं”

सातत्याने पक्षविरोधी विधानं केल्याप्रकरणी जनता दल संयुक्त (जेडीयू) चे उपाध्यक्ष राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर उर्फ ‘पीके’ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी प्रशांत किशोर यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. प्रशांत किशोर आमच्याबरोबर येऊ शकतात, त्यांचे ‘राजद’मध्ये स्वागत आहे. असं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “पदामुळे कोणी लहान-मोठं होत नाही; सुशीलकुमार मोदी आपण नेता आहात”

तर, नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर लगेचच प्रशांत किशोर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. “धन्यवाद नितीश कुमार. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. देव तुमचं भलं करो.” असं प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं होतं.