अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी मिळवलेल्या विजयावर प्रतिक्रिया देताना जम्मू-काश्मीर युथ काँग्रेसच्या नेत्यानं एक वादग्रस्त विधान केलं आहे. बायडन मोदी सरकारवर दबाव टाकून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ अ पुन्हा लागू करतील असं युथ काँग्रेसचा नेता जहांजेब सिरवाल यानं केलं आहे.

सिरवालने म्हटलं, “अमेरिकेत जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. भारताबाबत बोलायचं झालं तर यामुळे जम्मू-काश्मीरच्या राजकारणावर सकारात्मक प्रभाव पडेल. संपूर्ण जगात ज्याप्रकारे इस्लामोफोबिया वाढत आहे, त्यामध्ये घट होईल. बायडन यांची आधीची विधानं पाहिली तर हे लक्षात येत की ते भारत सरकारवर दबाव टाकतील आणि कलम ३७० आणि ३५ अ हटवण्याचा निर्णय परत घेण्यास भाग पाडतील.”

आणखी वाचा- बायडेन यांच्या विजयामुळे पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव; शुभेच्छा देताना इम्रान यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान जो बायडन यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. त्याचबरोबर बायडन यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) बाबतच्या भारताच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली होती.

आणखी वाचा- जाता जाता… ट्रम्प चालणार शेवटची चाल; चीन मुद्द्यावरुन बायडेन यांना आणणार अडचणीत

बायडन यांनी आपल्या धोरणांमध्येही काश्मीर, आसामच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे आणि चीनच्या उइगुर मुस्लिम आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांनीही काश्मीर आणि सीएएच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.