भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये सत्ता राखण्याबरोबरच आज हिमाचल प्रदेशमधील जनतेने भाजपच्या बाजूनेच कौल दिला. राज्यातील विधानसभेच्या ६८ जागांपैकी भाजपने ४४ जागांपर्यंत मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष भारतात फक्त चार राज्यांपुरता मर्यादित राहिला आहे. हिमाचल प्रदेशही भाजपकडे गेल्याने भाजपची एकहाती किंवा युतीच्या मदतीने सत्ता असणाऱ्या राज्यांची संख्या १९ झाली आहे. तर काँग्रेसकडे आता केवळ कर्नाटक, मिझोरम, मेघालय आणि नुकताच विजय मिळवलेले पंजाब अशी चारच राज्ये राहिली आहेत.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी बहुमत राखण्यात यश मिळाले आहे. काँग्रेस आणि नव्यानेच राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या राहुल गांधींनी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा केली होती. मात्र भाजपने गुजरातचा बालेकिल्ला राखतच हिमाचलमध्येही सत्तेच्या चाव्या हाती घेतल्या आहेत. या निकालामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेस- भाजपला आलटून पालटून सत्ता देण्याचा पॅटर्न कायम राखला. याशिवाय, या विजयामुळे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणखी एका राज्याची भर पडली आहे.

हिमाचलमधील विजयाबद्दल बोलताना भाजपचे नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आम्ही दोन्ही राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ९ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये मतदान झाले. त्यामध्ये एकूण ३३७ उमेदवारांनी मतपेट्यांच्या माध्यमातून आपले नशीब आजमावले. राज्यात ७५.२८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. एकूण ३७ लाख ८३ हजार ५८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजप आणि सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वच्या सर्व ६८ जागांवर निवडणूक लढवली.

या निवडणुकांकडे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा ट्रेलर म्हणून पाहिले जात असतानाच भाजपने आणखीन एक राज्यात सरकार स्थापन केल्याने काँग्रेसमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. १८ राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपकडे हिमाचल प्रदेश गेल्याने राज्यसभेमधील संख्याबळ वाढण्यास भाजपला सोपे झाले आहे.