लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याने मुलाला वाचवण्यासाठीच सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नाही अशी टीका मोदींनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची दिल्लीतील रामलीला मैदानात राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या दुस-या दिवशी नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यात काँग्रेसवर सडकून टीका करत मोदींनी पक्षाची निवडणुकीची रणनितीही मांडली.
दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने केवळ पक्ष वाचवण्यावरच मंथन केले. पण भाजपच्या बैठकीत देश वाचवण्यावर मंथन केले जाते असे सांगत मोदी म्हणाले, यंदाची निवडणूक विशेष आहे. ते प्रतिष्ठित (नेहरु-गांधी) घराण्यात जन्मले आहेत. मी एका गरिब घरात जन्मलो. ते (राहुल गांधी) नामदार आहे तर मी कामदार. चहावाल्याशी निवडणूक लढवण्यात त्यांना कमीपणा वाटतो असा टोलाही त्यांनी लगावला. पक्षाचे कार्यकर्ते पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी आले होते. मात्र त्यांना केवळ तीन सिलेंडर घेऊन घरी परतावे लागले असे सांगत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीची खिल्ली उडवली.
२०१४चा लढा हा सुराज्यासाठीचा लढा आहे, असे बोलत मोदी म्हणाले की, भारताचा पूर्व भाग विकासासाठी तडपतोय. भाजपचे सरकार आल्यानंतर पहिले काम पूर्व भारताचा विकास करणे असेल. प्रादेशिक अस्मितेला संकट न समजता ते विकासाची संधी होऊ शकते.