चीनी लष्कराच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून १०० टेहळणी विमानांची (ड्रोन) खरेदी करणार आहे. यामध्ये शस्ससज्ज आणि फक्त टेहळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अशा दोन्हीप्रकराच्या ड्रोन विमानांचा समावेश आहे. या संपूर्ण व्यवहाराची किंमत २०० कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचे समजते. भविष्यात चीनकडून होऊ शकणाऱ्या हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन भारतीय लष्कराची शस्त्रसज्जता वाढविण्याच्यादृष्टीने या ड्रोन विमानांची खरेदी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. भारताकडून मागणी करण्यात आलेल्या ड्रोन विमानांमध्ये अॅव्हेन्जर या लढाऊ जातीच्या ड्रोनबरोबर प्रेडिएटर एक्सपी या टेहळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनचाही समावेश आहे. देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर प्रेडिएटर एक्सपी ड्रोनचा वापर करण्यात येऊ शकतो.