देशाच्या आगामी वर्षभराच्या खर्चाचा लेखाजोखा अर्थात अर्थ संकल्प तयार करणे ही साधीसुधी गोष्ट नाही. या अर्थ संकल्पाचा मसूदा तयार झाल्यानंतर त्याची छपाई करणे क्रमपात्र ठरते. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेसाठी अर्थ मंत्रालयातील अनेक लोक दिवस-रात्र झटत असतात. मात्र, या प्रक्रियेची तयारीही खूपच रंजक पद्धतीने केली जाते. गोड आणि मधूर अशा हलव्याच्या पार्टीने अर्थ संकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जाते. अर्थ मंत्रालयामध्ये आता ही एक प्रथाच पडली आहे. येत्या ५ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामण लोकसभेमध्ये अर्थ संकल्प सादर करणार आहेत.


या प्रथेप्रमाणेच आज हलव्याच्या पार्टीने अर्थ संकल्पाच्या छपाईला नॉर्थ ब्लॉकमध्ये सुरुवात करण्यात आली. यानंतर आता पुढील १५ दिवस अर्थमंत्रालयातील १०० कर्मचारी मंत्रालयातच कैद होतील. संपूर्ण अर्थसंकल्पाची छपाई झाल्याशिवाय त्यांची मंत्रालयातून सुटका होणार नाही. यंदाच्या या हलवा पार्टीच्या कार्यक्रमाला नव्या सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सितारामण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीही उपस्थिती लावली तसेच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत हलवा खाऊन अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात करण्यात आली.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक आठवडा आधी अर्थमंत्रालयातील या कर्मचाऱ्यांना २४ तास नॉर्थ ब्लॉकमध्येच रहावे लागते एकदा हे कर्मचारी इथे कैद झाल्यानंतर अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडण्याची परवानगी मिळते. अर्थसंकल्पाची छपाई ही अत्यंत गोपनीय गोष्ट असल्याने या कर्मचाऱ्यांना १० दिवसांसाठी संपर्ण जगाशी संपर्क तोडावा लागतो.

अर्थसंकल्पाच्या छपाईच्या काळात अर्थमंत्रालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला अर्थ मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. छपाईशी संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बाहेर येण्यास किंवा आपल्या सहकार्यांसोबत भेटण्यासही परवानगी दिली जात नाही. जर एखाद्याला मंत्रालयातला भेट देणे खूपच गरजेचे असले तर त्याला सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखालीच आतमध्ये प्रवेश दिला जातो.