‘एफबीआय’च्या संचालकांची माहिती
कॅलिफोर्नियात पाकिस्तानी-अमेरिकी व्यक्ती व त्याची पाकिस्तानी पत्नी यांनी जो गोळीबार केला होता त्याबाबत दहशतवादी कृत्याच्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. त्या जोडप्याने फेसबुकवर आयसिस व त्यांच्या नेत्यांशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले होते. दरम्यान, अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही हल्लेखोरांना मूलतत्त्ववादाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली असून, अशा हल्ल्यांनी अमेरिका घाबरणार नाही असे स्पष्ट केले आहे.
एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांनी अमेरिकेच्या महाधिवक्ता लोरेटा इ लिंच यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले, की आता या प्रकरणाची चौकशी संघराज्य दहशतवाद चौकशी विभागामार्फत होत आहे याचे कारण म्हणजे त्या जोडप्याला परदेशी दहशतवादी संघटनांनी मूलतत्त्ववादाची शिकवण दिली होती. एफबीआय संचालकांनी सांगितले, की सॅन बेरनार्डिनो येथे १४ लोकांना ठार करणाऱ्या जोडप्याने मोठा कट आखला होता किंवा ते दहशतवादी संघटनेचे सदस्य होते याचे पुरावे मिळालेले नाहीत. अमेरिकी चौकशीकर्त्यांनी सांगितले, की पाकिस्तानी महिला व तिचा पाकिस्तानी-अमेरिकी पती यांनी प्राणघातक गोळीबार केला. त्यांनी फेसबुकचा प्रमुख अबु बकर अल बगदादी याच्याशी एकनिष्ठता दाखवली होती. अधिकाऱ्यांच्या मते सॅन बेरनार्डिनो येथील हल्ल्यात २७ वर्षांची महिला तशफीन मलिक ही सामील होती. ती सहा महिन्यांच्या बाळाची आई होती. तिने आपण अल बगदादी याच्याशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले आहे. मलिक ही पाकिस्तानी नागरिक होती तर फारूकचे आईवडील पाकिस्तानातून अमेरिकेत आले होते व हे जोडपे पोलिसांशी चकमकीत मारले गेले. आयसिस समर्थक आमाक या अरबी भाषेतील वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की मलिक व फारूक हे आयसिसचे सहानुभूतिदार होते, पण आयसिसने जबाबदारी मात्र घेतलेली नाही. एफबीआयच्या प्रमुखांनी सांगितले, की पहिल्या दोन दिवसांत तरी हे दोघे संघटित गटाचे सदस्य असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. आम्ही त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण अजून तसे संकेत मिळालेले नाहीत.