मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने पित्यावरच बलात्काराचा आरोप केला आहे. महत्वाचं म्हणजे हे सर्व आईच्या संमतीने घडलं असा पीडित मुलीचा दावा आहे. लॉकडाउनच्या काळात वडिलांनी आपल्यावर दोन वेळा बलात्कार केला असा आरोप या मुलीने केला आहे. पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
वडिलांनी माझे हात-पाय बांधले. आईने तोंडात कापड कोंबला. त्यानंतर वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला. आईच्यासमोर हे सर्व घडलं असा आरोप पीडित मुलीने केला आहे. मुलीच्या पालकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुलीचे एका स्थानिक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याला आम्ही विरोध केला म्हणून आम्हाला खोटया आरोपांमध्ये गोवण्याचा प्रयत्न होतोय असे तिच्या पालकांनी म्हटले आहे.
२६ मार्चला पहिल्यांदा आपल्यावर बलात्कार करण्यात आला. आईसमोरचं हे सर्व घडलं असं या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये म्हटलं आहे. पोलिसांपर्यँत पोहोचू नये, यासाठी पालकांनी आपल्याला खोलीमध्ये कोंडून ठेवलं असा आरोप या मुलीने केला आहे.
१० एप्रिलला दरवाजा तोडून पीडित तरुणी घरातून पळाली. ती तिच्या काकीच्या घरी गेली. पण आई-वडिल तिला पुन्हा घरी घेऊन आले. त्या रात्री पुन्हा माझ्यावर बलात्कार झाला असा आरोप पीडित मुलीने केला आहे. पीडित मुलीच्या मोठया बहिणीने १०९८ हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली. पीडिल मुलीने तिच्या शरीरावरील जखमा पोलिसांना दाखवल्या. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पालकांना ताब्यात घेतले आहे. मुलीने केलेल्या आरोपांच्या आधारावर पोलीस आता पुरावे शोधत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 12:59 pm