14 August 2020

News Flash

चीनची सैन्यमाघार

अजित डोभाल-वँग यी चर्चेचे सकारात्मक परिणाम

संग्रहित छायाचित्र

भारत-चीन धुमश्चक्रीत २० जवान शहीद झाल्याने तणावाचे केंद्र ठरलेल्या पूर्व लडाखच्या काही ठिकाणांहून चीनने सोमवारी सैन्यमाघारीस सुरुवात केली. चीनचे सैन्य दीड किलोमीटपर्यंत मागे सरकल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे तेथील तणाव निवळू लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

दोन्ही देशांत लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेत सैन्य माघारीवर मतैक्य झाले होते. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात रविवारी दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले.

चिनी बाजूकडे रविवारी सायंकाळी काही हालचाली सुरू होत्या. त्यावरून माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसत होते. आता त्यांनी संरक्षक बांधकामही पाडले असून ती जागा मोकळी झाली आहे. सैनिकांना माघारी नेण्यासाठी काही लष्करी वाहनांच्या हालचालीही दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चीनच्या सैन्यमाघारीची खातरजमा करण्यासाठी भारतीय लष्कराची काही पथके गेली होती. त्याबाबतचा तपशील मंगळवारी हाती येऊ शकेल. परंतु गलवान क्षेत्रातील सैन्यमाघारीचा आणि तेथील संरक्षक बांधकाम पाडण्यात आल्याचा पुरावा लष्कराकडे असल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तंबू आणि इतर साधनसामग्री, यंत्रणा गस्त चौकी क्रमांक १४ येथून हलवण्यास सुरुवात केली आहे. चिनी लष्कराची वाहने माघारी फिरल्याचे आणि गलवान, गोग्रा, हॉट स्प्रिंग भागांतून त्यांनी माघारीस सुरुवात केल्याचे दिसत आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी किमान दीड किलोमीटपर्यंत माघार घेतल्याचा अंदाज असला, तरी ते नेमके किती अंतर माघारी गेले आहेत, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.

पँगाँग सरोवर भागात चिनी लष्कराने मोठय़ा प्रमाणावर मोर्चेबांधणी केली होती. तेथील फिंगर ४ आणि फिंगर ८ दरम्यानच्या भागात मोठय़ा प्रमाणावर चिनी सैन्य होते. परंतु त्यांनी तेथून माघारीस सुरुवात केली आहे किंवा नाही याची ठोस माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारत आणि चीनमध्ये ३० जून रोजी वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेची तिसरी फेरी झाली होती. त्या वेळी दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्याने परंतु वेगाने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला लडाखला अचानक भेट देऊन जवानांचे मनोधैर्य वाढवले. विस्तारवादाचा अंत अटळ असतो, आता विस्तारवादाचे युग अस्तंगत झाले असून हे विकासवादाचे युग असल्याचा सूचक इशारा मोदी यांनी चीनला दिला होता. गलवान चकमकीनंतर लष्कराने सीमेवरील फौजफाटय़ात मोठय़ा प्रमाणावर वाढ केली होती. सुखोई, मिराजसह अनेक लढाऊ विमाने लष्करी तळांवर सज्ज ठेवली होती. आता सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाल्याने दोन्ही देशांतील तणाव कमी होऊ लागला आहे.

धुमश्चक्रीते सैन्यमाघार

१५ जून – गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात चकमक, २० भारतीय जवान शहीद. दोन्ही देशांतील तणाव विकोपाला.

१८ जून – ताब्यात घेतलेल्या १० भारतीय जवानांची चिनी सैन्याकडून मुक्तता.

३० जून – भारत-चीनमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवर झालेल्या चर्चेच्या तिसऱ्या फेरीत सैन्यमाघारीवर मतैक्य.

१ जुलै – लडाख सीमेवर भारताच्या अतिरिक्त लष्करी तुकडय़ा, रणगाडे सज्ज.

३ जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लडाखमधील निमलष्करी तळाला भेट; विस्तारवादाचे युग संपले, विकासवादाचे युग सुरू असल्याचा चीनला इशारा.

६ जुलै – भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात दूरध्वनीवर चर्चा.

तणाव निवळण्यावर उभय देशांत मतैक्य

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. चर्चेनंतर दोन्ही देशांनी सीमेवरून सैन्यमाघारीस सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे मान्य केल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने दिली. डोभाल आणि वँग यांनी तणाव निवळण्याबरोबरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याची ग्वाही परस्परांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:39 am

Web Title: withdrawal of both countries from galwan abn 97
Next Stories
1 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा
2 कानपूर चकमकप्रकरणी आणखी तीन पोलीस निलंबित
3 मोदींच्या ‘तीन चुका’ शिकवल्या जातील! – राहुल गांधी
Just Now!
X