नोटाबंदी काळातील माहिती ‘स्फोटक’ बनली!

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर फक्त पाच दिवस (१० ते १४ नोव्हेंबर २०१६) देशातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा जमा करण्याची मुभा होती. या कालावधी देशाच्या ३७० जिल्हा बँकांमध्ये २२,२७० कोटी जमा झाले. त्यापैकी सर्वाधिक रक्कम महाराष्ट्र (३९७६.७४ कोटी) आणि गुजरातमध्ये (३११८ कोटी) जमा झाली आहे. ही ‘माहितीच्या अधिकारा’त उघड झाली आहे. ‘नाबार्ड’ने दिलेले ही माहिती उघड झाल्यानंतर त्यातील आकडेवारी आता मात्र राजकीयदृष्टय़ा स्फोटक बनली आहे!

देशातील राज्य सहकार बँका आणि जिल्हा सहकारी बँकांमध्ये ८ नोव्हेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा किती जमा झाल्या, याची माहिती मनोरंजन एस रॉय यांनी ‘नाबार्ड’कडे १२ मार्च २०१८ मध्ये मागितली होती. त्यावर, ‘नाबार्ड’कडून ७ मे २०१८ रोजी उत्तर दिले गेले. राज्य सहकारी बँकांमध्ये ३० डिसेंबर २०१६ पर्यंतच जुन्या नोटा जमा करण्याची परवानगी दिली गेली. जिल्हा बँकांमध्ये ही मुदत १४ नोव्हेंबर २०१६ होती, असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी लागू करण्यात आली. जिल्हा सहकारी बँकांमध्ये जुन्या नोटा फक्त पाच दिवस म्हणजे १० ते १४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीतच जमा करण्याची मुभा रिझव्‍‌र्ह बँकेने दिली होती. याच पाच दिवसांच्या काळात देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांमध्ये एकूण २२,२७०.८० कोटी रुपये जमा झाले असल्याचे ‘नाबार्ड’ने नमूद केले आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जिल्हा बँकेत सर्वाधिक रक्कम?

’पुणे              ५५१ कोटी

’नाशिक        ३१९ कोटी

’सातारा          ३१२ कोटी

’सांगली          ३०१ कोटी

’कोल्हापूर       २५४ कोटी

’ठाणे               २२८ कोटी