दारूचे वाटप केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठीच भाजपाने मला २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शंकरसिंह वाघेला यांच्याविरोधात पराभूत होण्यासाठी पाठवले होते, असे वक्तव्य भाजपाचे गुजरातमधील पंचमहलचे खासदार प्रभातसिंह चौहान यांनी केले आहे. चौहान हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.

लोक जनशक्ती पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने मला वाघेला यांच्याविरोधात पराभूत होण्यासाठी पाठवले होते. परंतु, मी १९२४ मतांनी विजयी झालो. त्यानंतर अमूल डेअरीचे अध्यक्ष रामसिंह परमार यांनी माझ्याविरोधात २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा मी पुन्हा १.७२ लाख मतांनी विजयी झालो. मला पंचमहल मतदारसंघातून कोणी पराभूत करू शकत नाही. पुढील लोकसभा निवडणूकही मी २.५ लाख मतांनी विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.

माझ्या तिकीटाची चिंता करू नका, ते मलाच मिळणार आहे, असे म्हणत मागील निवडणुकीत दारूचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. हे मी सांगू इच्छित नाही, पण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दारूचे वाटप करण्यात आले आहे. दारू वाटपाशिवाय निवडणूक जिंकताही येत नाही. पण मी गळ्यात माळ घालतो. मी एक भगत आहे. दारू मी कधी पाहिलीही नाही, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.