उबेर कॅब बलात्कार प्रकरण
उबेर कॅब बलात्कार प्रकरणातील पिडीत तरुणीसह अभियोजन पक्षाच्या १३ साक्षीदारांना परत बोलावून त्यांची फेरतपासणी करण्यास परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल ठरवला.
या प्रकरणातील आरोपी टॅक्सीचालक शिवकुमार यादव याच्या अर्जावर अनुकूल निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने अभियोजन पक्षाच्या १३ साक्षीदारांना परत बोलावण्याची परवानगी दिली होती, तसेच त्यांची दैनंदिन तत्त्वावर उलटतपासणी करण्यास सांगितले होते. या आदेशाला सर्व साक्षीदारांनी, तसेच दिल्ली पोलिसांनी आव्हान दिले होते. हा आदेश म्हणजे या खटल्याची फेरसुनावणी करणे होय, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १० मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर राखून ठेवलेला आदेश गुरुवारी जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जे.एस. खेहर व न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचे अपील मान्य केले.