शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या रेहाना फातिमाला पथानामथिट्टा पोलिसांनी अटक केली आहे. रेहाना फातिमा ही महिला सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने केरळमधल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. रेहाना फातिमाने केरळच्या शबरीमला मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न ऑक्टोबर महिन्यात केला होता तिच्या या प्रयत्नानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही उसळला होता. रेहाना फातिमा यांनी लाखो हिंदू भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्यावेळीही करण्यात आला होता. रेहाना फातिमाने जी फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

सुप्रीम कोर्टाने शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला हिरवा कंदिल दिल्यावर रेहाना फातिमाने या मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. तिला अडवण्यात आले तेव्हा तिने तिथेच ठिय्याही मारला होता. गाभाऱ्यापासून ५०० मीटर अंतरावर तिला रोखण्यात आले. त्यानंतर बराच गदारोळही माजला होता. मला अयप्पाचे दर्शन घ्यायचे आहे मी सगळ्या धर्मांवर विश्वास ठेवते आणि सगळ्या धर्मांचा सन्मान करते असे रेहानाने म्हटले होते.

रेहाना फातिमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिने लिहिलेल्या फेसबुक पोस्ट आक्रमक आणि अनेक रुढी परंपरांचा विरोध करणाऱ्या आहेत हे स्पष्ट होते आहे. तिचे विचार आक्रमक आहेत हे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून स्पष्ट होते आहे. अशात आता फेसबुक पोस्टमुळेच तिच्या अडचणी वाढल्या आहेत.