झारखंडच्या विधासनभेमध्ये एका विचित्र प्रकरणावरुन गोंधळ झाला. बहरागोडा येथील झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम पक्षाचे आमदार कुणाल सारंगी यांनी उपस्थित केलेल्या एका विषयावरुन हा गोंधळ झाला. घाटशीला उपविभाग रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अशरफ बदर या डॉक्टरने एका महिला रुग्णाला धक्कादायक सल्ला दिल्याचे सारंगी यांनी विधानसभेत सांगितले. पोटदुखीची तक्रार घेऊन एक महिला अशरफ यांच्याकडे गेली असता डॉक्टरांनी तिला तपासले. त्यानंतर त्या महिलेल्या लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये अशरफ यांनी कंडोम वापरण्याचा सल्ला दिला होता. या प्रकरणाची तक्रार सारंगी यांनी थेट मुख्यमंत्री रघुवर दास आणि राज्याचे आरोग्य मंत्री रामचंद्र चंद्रवंशी यांच्याकडे केली आहे. अशरफ यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची मागणी सारंगी यांनी केली आहे.

पीडित महिला ही घाटशीला उपविभाग रुग्णालयामध्येच चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करते. ‘अनेक दिवसांपासून मला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे मी २३ जुलै रोजी डॉक्टर अशरफ यांच्याकडे गेले. त्यावेळी मी त्यांना पोटात गॅस झाल्याने पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर डॉक्टरांनी मला औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन) दिले. जेव्हा मी ती चिठ्ठी घेऊन औषधे आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेले तेव्हा अशरफ यांनी त्या चिठ्ठीमध्ये कंडोम असं लिहिल्याचं मेडिकलवाल्याने मला सांगितले’ अशी माहिती या महिलेने दिली आहे.

घडलेल्या प्रकारानंतर या महिलेने रुग्णालय व्यवस्थापनाकडे डॉक्टर अशरफ यांच्याविरुद्ध तक्रार केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. विधानसभामध्ये हा मुद्दा उपस्थित झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये हे प्रकरण वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

डॉक्टर म्हणतात…

या प्रकरणाबद्दल बोलताना डॉक्टर अशरफ यांनी नक्की ही माहिला कधी आली होती याबद्दल आपल्याला आठवत नसल्याचे म्हटलं आहे. तसेच या महिलेऐवजी तिचा मुलगा किंवा सून माझ्याकडे तपासणीसाठी आले असतील आणि त्यांना मी प्रिस्किप्शनवर कंडोम लिहून दिले असेल अशी शक्यता अशरफ यांनी व्यक्त केली आहे.