केरळमध्ये राहणाऱ्या ३६ वर्षांच्या शोभा साजू यांचा आनंदात संसार सुरु होता…पण तीन वर्षांपूर्वी त्यांच्या संसारात एका न्यूड व्हिडिओने वादळ आणले…या वादळात शोभा यांचा संसार उद्ध्वस्त झाला…तिन्ही मुलांना घेऊन पती दुसरीकडे निघून गेला आणि शोभा एकाकी पडल्या, पण शोभा यांनी धाडसाने या परिस्थितीचा सामना केला, आता तीन वर्षांनी त्या व्हिडिओतील महिला शोभा साजू नसल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. ‘आता माझी तिन्ही मुलं समाजात ताठ मानेने वावरु शकतील, त्यांना माझी लाज वाटणार नाही’, असे सांगतानाच सायबर गुन्ह्यांविरुद्ध मोहीम सुरु करण्याचा निर्धार शोभा यांनी केला आहे.

कोच्चीत राहणाऱ्या शोभा यांचे पती साजू जोसेफ यांच्या कंपनीत काम करणाऱ्या लिट्टो थंकचन याने ऑक्टोबर २०१५ मध्ये व्हॉट्स अॅपवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओतील महिला शोभा असल्याचे चर्चा जोसेफ यांच्या कंपनीत सुरु झाली. हा व्हिडिओ कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला होता. ६ मिनिट १७ सेकंदांच्या या व्हिडिओने एका क्षणात शोभा यांचा संसार उद्ध्वस्त केला. जोसेफ तिन्ही मुलांना घेऊन दुसरीकडे राहायला गेले. शोभा यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हे प्रकरण सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी लिट्टो याला अटकही केली.

पण, शोभा इतक्यावर थांबल्या नाही. या व्हिडिओतील महिला मी नाही हे शोभा यांना सिद्ध करायचे होते आणि इथूनच त्यांच्या लढ्याला सुरुवात झाली. शोभा यांनी एप्रिलमध्ये पोलीस महासंचालकांची भेट घेत या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची विनंती केली. पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण कोच्चीतील सहाय्यक पोलीस आयुक्त के. लालजी यांच्याकडे सोपवले. या पथकाने सी-डॅकची मदत घेतली. या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास सुरु झाला. तो न्यूड व्हिडिओ आणि शोभा यांचे व्हिडिओ व फोटो सी-डॅककडे पाठवण्यात आले. या दोन्ही गोष्टींचा सखोल तपास करण्यात आला. याशिवाय शोभा या स्वत: देखील तिथे हजर झाल्या. शोभा यांच्या शरीरावरील खूण आणि व्हिडिओतील महिलेच्या शरीरावर खूण यातील तफावतही यातून समोर आली. फॉरेन्सिक तपासात शोभा या निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. ‘त्या व्हिडिओतील महिला या शोभा साजू नाहीत’ असा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे. यामुळे शोभा यांना दिलासा मिळाला आहे. आता माझी तिन्ही मुलं ताठ मानेने समाजात वावरु शकतील, त्यांची आई अशा कोणत्याच व्हिडिओत नव्हती हे ते सांगू शकतील, असे शोभा सांगतात. हा व्हिडिओ कोणी सर्वप्रथम शेअर केला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

शोभा यांच्या पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला शोभा यांना तिन्ही मुलांना आठवड्यातून एकदा भेटायची परवानगी दिली होती. पण मोठ्या मुलीने आईने मारहाण केल्याची तक्रार केल्याने न्यायालयाने ही परवानगी रद्द केली. ‘पतीच्या दबावातून मुलीने न्यायालयात ही तक्रार केली’, असे शोभा सांगतात. आता सायबर गुन्ह्यांविरोधात लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तर शोभा यांचे पती साजू जोसेफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ‘या घटनेने आम्हाला खूप वेदना दिल्या. आता शोभावरील कलंक पुसला गेला असला तरी पुन्हा आम्ही एकत्र येऊ शकत नाही’, असे त्यांनी सांगितले.