तिहेरी तलाक विरोधात पोलिसात धाव घेतली म्हणून एका २२ वर्षीय महिलेला पती आणि सासू-सासऱ्यांनी जिवंत जाळले. उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती जिल्ह्यातील गद्रा गावात शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. मृत महिलेच्या पाच वर्षाच्या मुलीसमोर हा सर्व प्रकार घडला. जावयाने नफीसने (२६) सहा ऑगस्टला फोनवरुन आपल्या मुलीला घटस्फोट दिला असा आरोप रमझान खान यांनी केला आहे. रमझान खान मृत महिला सईदाचे वडिल आहेत.

सईदा तिहेरी तलाकविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. पण पोलिसांनी नवऱ्याला मुंबईवरुन येऊं दे असे सांगून तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. नफीस मुंबईवरुन परतल्यानंतर १५ ऑगस्टला पोलिसांनी दोघांना बोलवून घेतले व त्यांच्याशी चर्चा केली. पोलिसांनी सईदाला नफीस सोबत राहण्याचा सल्ला दिला असे रमझान खान यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शुक्रवारी दुपारी माझे वडिल नमाज पठन करुन घरी आल्यानंतर त्यांनी आईला घर सोडण्यास सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली असे फातिमाने पोलिसांना सांगितले. माझे आजोबा अझिझुल्लाह आजी हसीना आणि दोन काक्या गुडिया, नादिरा तिथे आल्या. वडिलांनी माझ्या आईचे केस पकडले व तिला मारहाण सुरु केली. माझे आजी-आजोबा सुद्धा वडिलांना साथ देत होते.

गुडिया आणि नादिराने आईच्या अंगावर केरोसिन टाकले व आजी-आजोबानी तिला पेटवून दिले असे फातिमाने पोलिसांसमोर सांगितले. फातिमा सईदाची मुलगी आहे. सईदाचा भाऊ रफिक फातिमाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने पोलिसांसमोर सर्व घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी एफआयआर नोंदवून सईदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही. मी बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टातही जाईन असे रफिकने सांगितले. नफीस आणि त्याच्या कुटुंबाविरोधात हुंडयासाठी छळ, हत्या या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तिहेरी तलाकसह सर्व आरोपांची चौकशी होईल असे श्रावस्तीचे एसपी आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले.