चोराच्या एटीएम कार्डावरुन पोलिसानेच पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कायालविझी यांच्यावर चोराच्या दोन एटीएम कार्डांवरुन अडीच लाख रुपयांची रोकड काढल्याचा आरोप आहे. कायालविझी २००४ बॅचच्या महिला पोलीस निरीक्षक आहेत. चेन्नई सेंट्रल रेल्वे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक पदावर असताना कायालविझी यांनी हा गुन्हा केला. अजून त्यांना अटक केलेली नाही.

मे महिन्यात साहुल हमीदला (४८) एक्सप्रेस ट्रेनमधून अटक करण्यात आली होती. एसी डब्यातून प्रवास करत असताना त्याने सहप्रवाशाच्या महागडया वस्तू चोरल्या होत्या. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या महागडया वस्तू जप्त केल्या. कायालविझी यांनी जप्त केलेली १३ एटीएम कार्ड जमा केली पण साहुलची दोन कार्ड आपल्याकडे ठेवली होती.

शहरातील वेगवेगळया एटीएममधून अडीच लाख रुपये काढल्याचे मेसेज साहुलच्या मोबाइलवर आल्यानंतर त्याच्या बहिणीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. प्राथमिक चौकशीतून कायालविझीने वेगवेगळया एटीएममधून अडीच लाख रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी एटीएम केंद्रातून कायालविझी पैसे काढत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले.