गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत तमिळनाडूमध्ये द्रमुकने सत्ता हस्तगत केली आहे. करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दरम्यान निवडणुकीत द्रमुकला मिळालेल्या विजयानंतर एका महिलेने जीभ कापून देवाला अर्पण केल्याची घटना समोर आली आहे.

३२ वर्षीय वनिता यांनी २०२१ विधानसभा निवडणुकीत द्रमुकला विजय मिळाला तर आपली जीभ अर्पण करु असा नवस केला होता. निवडणुकीत द्रमुकला विजय मिळाल्यानंतर वनिता मंदिरात पोहोचल्या आणि जीभ कापून देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न केला.

पण करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरही निर्बंध आहेत. वनिता यांनी मंदिराच्या गेटवरच आपली कापलेली जीभ ठेवली आणि काही वेळातच जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

तमिळनाडूत द्रमुक; केरळमध्ये पुन्हा डावे

२३४ सदस्यीय विधानसभेत द्रमुकला १३५ जागा मिळाल्या. काँग्रेस, डावे पक्ष या आघाडीतील मित्र पक्षांना मिळालेल्या जागांवरून द्रमुक आघाडीने १५४ जागांवर विजय संपादन केला. द्रमुक नेते स्टॅलिन हे लवकरच मुख्यमंत्रिपद स्वीकारतील, असे द्रमुकच्या गोटातून सांगण्यात येत होते.

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या आणि जयललिता यांच्या निधनानंतर करिश्मा असलेला चेहरा नसतानाही अण्णा द्रमुकला ७० जागा मिळाल्या. अण्णा द्रमुकबरोबर युती केलेल्या भाजपाने राज्यात हातपाय पसरण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. भाजपला चार जागांवर विजय मिळाला. चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी मक्कल निधी मयम हा पक्ष स्थापन करून राज्यात राजकीय वातावरण तापविले होते. आपला पक्ष राज्यात चांगली कामगिरी करेल, असा दावा ते करीत होते. पण कमल हसन यांचा एकमेव अपवाद वगळता पक्षाचा पार धुव्वा उडाला.