लोकल ट्रेनमध्ये झोप लागल्याने शेवटच्या स्टेशनला एखाद्या प्रवाश्याला झोपेतून उठवल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. कॅनडातही असंच काहीसं झालं एका महिलेबद्दल पण विमानामध्ये. या महिलेला विमानात झोप लागली आणि जाग आली तेव्हा लाइट्स बंद असणाऱ्या पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या विमानात ती एकटीच होती. या महिलेने फेसबुकवर हा प्रसंग शेअर केला आहे.

टिफनी अॅडम्स असं या महिलेचं नाव असून तिने फेसबुकवर घडलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन केले आहे. एअर कॅनडाच्या विमानाने ही महिला टोरांटोला येत होती. मात्र विमानामध्ये या महिलेला झोप लागली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा विमानातील सर्व लाइट्स बंद झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने विमानाच्या खिडकीमधून डोकावून पाहिले असता आजूबाजूला अंधार होता आणि विमान पार्किंगमध्ये पार्क करण्यात आले होते. रिकाम्या आणि बंद असणाऱ्या विमानामध्ये काही तास ती एकटीच होती या विचाराने तिला खूप भिती वाटली असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘मी मध्यरात्रीच्या सुमारास उठले, विमान लॅण्ड झाल्यानंतर काही तासांनी उठले मी. मी माझ्या सीटवर पडून होते मला थंडी वाजत होती. मला अंधाराची प्रचंड भिती वाटते त्यातच हा असा अनुभव असल्याने माझी अवस्था कशी झाली असेल तुम्ही विचार करु शकता. मला आजही या घटनेनंतर वाईट स्वप्न पडतात आणि एकच प्रश्न मला सतत सतावतो हे असं कसं होऊ शकतं?’, असं टिफनी आपल्या पोस्टमध्ये लिहिते.

टिफनीची संपूर्ण पोस्ट खालीलप्रमाणे

आपण विमानात एकटेच अडकले असल्याचे लक्षात आल्यानंतर मी घाबरले. त्याच विमानातील सर्व दिवे बंद झाले होते आणि मी फोनही चार्ज केला नव्हता हे लक्षात आल्यानंतर तर मला अधिकच अस्वस्थ वाटू लागले. मात्र कॉकपीटमध्ये शोधाशोध केल्यावर तीला एक प्लॅश लाईट (बॅटरी) सापडली. त्यानंतर विमानाचा पुढचा दरवाजा उघडण्यात यश आले. जमिनीपासून ४० ते ५० फूटांवर असणाऱ्या त्या दरवाजामधून लटकून तिने तो फ्लॅश लाईट मारल्याचे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. काही वेळानंतर विमानातून येणाऱ्या प्लॅश लाईटकडे लक्ष गेल्यानंतर विमानतळावरील कर्मचारी लगेज वाहून नेणारे वाहन घेऊन टिफनीच्या मदतीला आले. तिला खाली उतरवून विमानतळावरील मुख्य कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.

या प्रसंगानंतर मला कधीच शांत झोप लागली नाही असं टिफनीने एअर कॅनडाच्या फेसबुक पेजवर केलेल्या एका लांबलच पोस्टमध्ये म्हटलं आहे. विमानातील त्या प्रंसगानंतर माझी भिती आणखीन वाढली आहे. अनेकदा मी झोपेतून घाबरून उठते असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.