धावत्या ट्रेनमध्ये दरवाजाजवळ पडलेला मोबाइल फोन उचलताना झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मडावी अश्विनी असे या तरुणीचे नाव आहे. हैदराबादच्या बेगमपेठ रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. सिताफलमंडी स्थानकातून अश्विनीने ट्रेन पकडली होती. ती नेचर क्युर रेल्वे स्थानकात उतरणार होती. मात्र त्याआधीच ही दुर्देवी घटना घडली.

अश्विनी नेचर क्युर येथे एका प्रिटिंग प्रेसमध्ये नोकरी करायची. या भीषण अपघातात अश्विनीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. सकाळी ९.३०च्या सुमारास अश्विनीने ट्रेन पकडली होती. ही गर्दीची वेळ होती. अनेकांना या वेळेत कार्यालय गाठण्याची घाई असते. ट्रेन बेगमपेठ रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर अश्विनी दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली. कारण पुढच्सा स्टेशनवर तिला उतरायचे होते असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

दरवाजाजवळच्या खांबाला पकडून अश्विनी उभी होती. त्यावेळी तिचा मोबाइल खाली पडला. मोबाइल उचलण्यासाठी म्हणून ती खाली वाकली तितक्यात तिचा तोल गेला. अश्विनी ट्रेनच्या बाहेर फेकली गेली तरीही तिने तो खांब सोडला नाही. तिचे पाय ट्रेनच्या चाकामध्ये येऊन अश्विनीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. काही मीटर अंतरापर्यंत ती फरफटत गेली असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ट्रेन थांबली तेव्हा तिचा फोन आणि बॅग दोन्ही ट्रेनमध्येच होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला.