वयाच्या १२ वर्षी दोघांकडून करण्यात आलेल्या बलात्कारानंतर आई झालेल्या पीडितीने तब्बल २७ वर्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मुलाने आपल्या वडिलांचं नाव विचारल्यानंतर महिलेने पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे ही घटना घडली आहे

२७ वर्षांपूर्वी पीडित महिला आपली बहिण आणि भावोजींसोबत राहत होती. यावेळी तिथेच राहणाऱ्या नाकी हसन नावाच्या व्यक्तीने घरात एकटी असल्याचं पाहून पीडितेवर बलात्कार केला होता अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनंतर त्याचा भाऊ गुड्डू यानेही तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही आरोपींनी अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. घटना घडली तेव्हा महिलेचं वय फक्त १२ वर्ष होतं.

आणखी वाचा- १४ वर्षाच्या मुलावर बलात्कार करणाऱ्या महिलेला झाली गर्भधारणा; बाळाला देणार जन्म

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या १३ व्या वर्षी पीडित गर्भवती झाली आणि १९९४ मध्ये मुलाला जन्म दिला. यानंतर ते मुल पीडितेच्या उधमपूर गावातील एका व्यक्तीकडे सोपवण्यात आलं. तर पीडित महिला बहिण आणि तिच्या कुटुंबासोबत रामपूरला निघून गेली.

पीडितेच्या भावोजींनी गाझीपूरमधील एका व्यक्तीशी तिचं लग्न लावून दिलं. पण १० वर्षांनी जेव्हा तिच्या पतीला बलात्काराची माहिती मिळाली तेव्हा त्याने घटस्फोट दिला. यानंतर पीडित महिला उधमपूरला परतली.

आणखी वाचा- मला बंदूक खरेदी करण्याचा आणि ठेवण्याचा परवाना द्या; पीडित मुलीची मागणी

यादरम्यान तिचा मुलगा मोठा झाला होता आणि आपल्या आई-वडिलांबद्दल चौकशी करत होता. आईची माहिती मिळाल्यानंतर तो पीडितेला भेटण्यासाठी पोहोचला आणि त्याला घटनेची माहिती मिळाली. महिलेच्या तक्रारीनंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर महिलेने कोर्टात धाव घेतली होती. पोलीस याप्रकरणी तपास करणार असून मुलाची डीएनए चाचणी केली जाणार आहे.